Thursday, November 13, 2008

शंकर नारायण माहूरकर (मृत्यू: १९४९) यांचें आत्मवृत्त- २

असो नंतर माझा उपनयन विधी करण्यांत आला. आतां पर्यंतचा गेलेला काळ माझे आठवणीचा नसून तो आमचे वडील बंधूचे सांगण्या वरून दिलेला आहे. या पुढील वृत्त मात्र मला पूर्णपणे आठवते. ती जस जशी घडली तस तशी वाचका पुढें सादर करीत आहे.
नंतर तेथेंच माझा उपनयन विधी उरकण्य़ात आला. ते वेळीं माझी सर्व उजळणी झाली होती. त्या वेळीं हल्लीं सारखीं घड्याळें नव्हतीं. त्यामुळी शिक्षकांचे अध्यापनाचें काम "दुपार झाली जेवाय जाऊं "संध्याकाळ झाली पर्वता देऊं" या प्रमाणें चालत असे, इतक्या वेळांत लेखन, वाचन, व हिशेब हे तीनच विषय शिकविले जात. त्यामुळें तीं मुलें व्यवहारोपयोगीं कामांत तरबेज होत असत. उजळणी तर इतकी सुरेख होत असे कीं विचारलेल्या प्रश्नाचें उत्तर प्रश्न विचारण्याचाच अवकाश कीं उतार मिळालेंच. असो. वाशीम येथें एक माझा आतेभाऊ असे. त्याचे ओटी भरण्याची पत्रिका आले वरून माझे वडिलांनीं माझे बंधुस व मला तिकडे पाठविलें. ते वेळीं माझी तेथील आत हयात होती. त्या मुळें तिचा आग्रह मला आपले पाशीं ठेवावा असा पडला. व मी रहावें म्हणून माझे अनेक परी समजूत करण्याचें काम सुरूं झालें. तेथें तुझी आत आहे. तशी येथें ही आहे. येथील शाळा, इंग्रजी शिक्षण, बाजार, व दुकानें, बालाजीचें देवालय वगैरें सर्व दाखवून असे नर्शीस कोठें आहे. असे मला वारंवार विचारून, मग तूं आतां येथेंच आमचे पाशी रहा. असा सर्वांनीं माझा पिच्छा पुरविला. अन्न पाणी ऋणानुबंधानें मी त्यांचे म्हणण्यास रुकार दिला. व माझे वडील बंधु मला तेथें ठेवून नर्शीस निघून गेले. नंतर वाशीम येथिल देवपेठ शाळेंत पहिले वर्गात माझें नाव घालण्यात आलें. माझी उजळणी, वाचन, वगैरे विषय चांगले असले मुळें मी पांच महिन्याचे अवधींत दुररीत गेलो. दुसरींत असतांना ..........

No comments: