Thursday, November 6, 2008

शंकर नारायण माहूरकर (मृत्यू: १९४९) यांचें आत्मवृत्त-१

||श्री||
||गजनान प्रसन्न.||
(शंकर नारायण माहूरकर यांचें आत्मवृत्त )
मुळची हकीकत.
माहूरकर या आडनांवा वरून आमची मूळ वस्ती निजाम स्टट मधील मातापूर क्षेत्र (माहूर) असावे. तेथून आमचे पूर्वजापैकी कोण कोण इंगोली नजीक नर्सी येथे रहावयास आले. तेथे येऊन किती पिढ्या झाल्या. या संबंधात विश्वसनीय उपलब्ध माहीती नसले मुळे देता येन नाहीं. तरी नर्सीस येऊन निदान दोनशे वर्षेंतरी झालीं असावी.
माझे वडिलांचे नांव नारायणदादा माहूरकर यांचा धंदा वैद्यकीचा या शिंवाय पुराण वाचणे हाही होता. यांना दोन भाऊ असत. तिघेही कुटुंब वत्सल असून सर्व एकत्र असत. त्यांच्या पोषणाचा विशेष बार माझे वडिलावरच असे. पण पुढें घरांत स्त्रियांचे वाद सुरू होऊन त्याचें पर्यवसान कुटुंबाचा विभक्त पणाहोण्यांत झाले. माझे वडिल इस्टेंटिचा वाटा न मागतां वसमत येथे जाऊन तेथील एका श्रीमंत घराण्याचे आश्रयास राहून व वैद्यकी करुन आपला संसाररुपी गाडा सुखानें चालवूं लागले.

इकडे नर्सीस स्थाईक वृत्ती बेताचीच असले मुळे गंगाराम यांचे अंगी विद्वत्ता नाही म्हणून त्यांनी दररोज संपुष्ट हाती घेऊन घरोघर भिक्षा मागुन त्यावर आपला उदरनिर्वाह सुरू ठेविला. त्यांना जी मुले झाली त्यापैकी दाजी म्हणून एक मुलगा हल्लीं नर्सीस आहे.

द्वीतीय बंधु राघोबा हे बेदर येथे जाऊन राहीले. त्यांचा मुलगा रुक्मांगद हा हल्ली तेथेंच असून त्याचे लग्न वैगरे काहीं झालेलें नाहीं. हल्ली त्याचे वय ७५ चे असावें.

तृतीय बंधु रामचंद्र यांना काशीनाथ माहूरकर एक मुलगा झाला. हे मोगलांईत पोष्टमास्तर होते. त्यांना जैराम उर्फ़ आपा हा मुलगा व वेणू म्हणून एक कन्या होती. हल्ली जैराम हा परभणी येथे वकीली ५/७ वर्षांपासून करीत आहे. पण अद्याप पावेतो लक्ष्मीबाईचे आगमन झालेलें दिसत नाहीं.

वेणू ही परभणी येथेंच दिलेली होती ती २/१ वर्षां पूर्वीं वारली. तिला एक मुलगा व दोन मुली आहेत.

माझे आईचे नाव सावित्री बाई ही कोडोळी ची मला सात जण मामे होते. आज माझे वयास साठ चे जवळ झाले. इतक्या अवधीत मी कोडोळी पाहीली नाहीं. व एक सुद्धा मामा ही पाहीला नाहीं. याचे कारण पुढे माझ्या चरित्रा वरून ध्यानात येईल.

माझे मुळचें नावं देवीदास परंतू मी तान्हा असतांना इतका आजारी होतो कीं माझा भरवसाच माझे माता पितरांना वाटे ना. पण माझी आयुर्यामर्यादा पुढें होती. त्या मुळें शंकराचार्याची स्वारी तेथें आली व आम्ही त्या श्रीमंताचे वाड्यांत रहात होतों त्यांचेच घरीं ते उतरले. इकडे आमचे घरांत माझ्या असाध्य आजारामुळें आईनें मोठ्यानें आक्रोश सुरु केला. तिला यापूर्वी पाच सात मुले झाली पण त्यापैकी एकच मुलगा हयात होता. व त्याचे नाव बाळकृष्ण असे होते. तो या वेळी सरासरी १२/१४ वर्षांचा असावा. ताचे मागून झालेलीं मुलें सर्व वारली. आतां हेंही मुल जगण्याचें चिन्ह दिसेना म्हणून तिचा शोक अनावर होणें सहाजीकच होते. मोठ्यांनीं चाललेल्या रोदनाचा ध्वनी शंकराचार्यांचे कर्णी जाताच. कोण रडते ? असा त्यांनी प्रश्न केला. तेव्हा नजीकच्या मंडळींनी सर्व हकीकत स्वामींना निवेदन केली. तेव्हां ते म्हणाले या लेकराला इकडे आणा पाहूं? मग काय मला लागलीच तेथे आणून स्वामी पुढें ठेवण्यात आले. त्यांनी मला पाहून आपलें जवळील तीर्थ व अंगारा माझे अंगास लाववीला व मी येथें आहे तों पर्यंत रोज तीर्थ व अंगारा घेत जा व याचे अंगास लावीत जा असें माझे आईस सांगण्यात आले. नंतर ते तिला म्हणाले याचें नांव काय आहे? आई- देवीदास. स्वामी-असें काय. आज पासून आम्ही याचें नांव शंकर ठेवतों तुम्ही देखिल याच नांवानें हाक मारीत जा. झालें, तेव्हां पासून मला शंकर नांवांनीं हाक मारण्यास सुरवात झाली. माझी प्रकृती ही चांगली झाली. पुढें कांहीं दिवस आमचें घरांत आनंदाचें साम्राज्य चालूं होते. पण गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांना काही दिवस सौख्याचे तर कांहीं दिवस दुःखाचे, हे ज्याच्या त्याच्या पूर्व संचिता प्रमाणें कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. एकादशी चे मागें पारणें होणारच. त्या प्रमाणे आमचे घरास पुन्हा दुःखाची लाट उसळली. मातोश्री बाळांद होऊन माझे पाठीवर मुलगा झाला. बारा दिवस लोटले मुलाचे नाव सांभ ठेवण्य़ात आले. पुढें लवकरच आईची प्रकृती बिघडली. पुष्कळ उपाय करण्यात आले. पण उपयोग न होता ती मृत्युमुखीं पडली. तें वेळी मी फ़ारच अज्ञानं दशेत असले मुळें, माझे पित्यावर व वडील बंधूवर या दुःखाचे किती आघात झाले असतील याची कल्पनाच नव्हती. घरातं आई शिवाय दुसरे कोणी नव्हते. तान्हा मुलगा आईचे आधी वारला कीं मागाहून गेला हें समजण्यास मार्ग नाहीं.
आमचे खाण्या पिण्याची बंडाळ होऊं लागली. तेंव्हा आम्हाला घेऊन पुन्हा परत नर्सीस आले. ज्या घरांतून उपरणें खांद्या वर टाकून स्वारी बाहेर पडली व आपल्या गुणावर वसमत येथें संसार थाटाचा केला अशा त्या मानी सभावाच्या माझ्या वडिलांना प्रारब्ध योगानं पुन्हा परत नर्सीस यावे लागले तरी आपले स्वतः चे घरीं नजातां किंवा बंधुची अपेक्षा न करतां तेथें एक भालेराव या आडनावाचे सुख वस्तु गृहस्थ रहात असत. त्यांचे वाड्यांतील एक खोली मागून त्यांत सर्व सामान टाकलें व त्याच गांवांत माझी आत म्हणजे वडिलांची सख्खी बहीण कवराचे घरीं दिली होती. तिचे स्वाधीन आम्हा परदेशी झालेल्या उभय बंधुस देण्यात आलें. ते वेळीं घरांत कोणी स्त्री जाती पैकीं नसले मुळे> परक्या झालेल्या मुलांना दुसऱ्याचे स्वाधीन करावे लागत आहे या बद्दल वडिलांना किती दुःख झालें असेल याची कल्पना बाल्ल्यावस्थेंत असणाऱ्या अज्ञ मुलाला काय असणार. आमची सोय लावले नंतर मला तेथील शाळेंत घालण्यांत आले. ते वेळीं स्लेट पाट्यांची तिकडे आयात सुरु झालेली नव्हती म्हणून लाकडी पाटीवर माले व गेरु यांचे साह्यानें शिकविले जात होते.


वडिलांनी तेंव्हा पासून घरीं न रहातां केव्हां तीर्थ यात्रा, केव्हां खेड्यावर पोथी लावणें केव्हां वैद्यकी निमित्त तेथेंच राहणें असा काळ घालविला. त्यांचा स्वभाव मन मिळाऊ, आनंदी, निर्व्यसनी, असा असून त्यांना निरनिराळ्या नकला, गोष्टी, कहाण्या वगैरे फ़ार येत होत्या. त्यामुळे ते जेथें जातील तेथें मुला बायकांना ईतका आनंद होत असे कीं पंधरा पंधरा दिवस सुद्धां त्यांना निघूं देत असत. या शिवाय ब्रम्हकर्मात ही ते निपूण होते. त्या वेळचा काळ म्हणजे पन्नास वर्षां पूर्वीचा असा होता कीं त्या वेळीं आगगाड्या, रस्ते वगैरे मुळीच नव्हते. त्या मुळें मालाची ने आण मुळीच नव्हती. त्या योगानें बहुतेक सावकार व शेतकरी यांचे संग्रहास धान्याची विपुलता असले मुळें त्यांचे आश्रितांस ही खाण्यापिण्याचे बाबतींत मुळींच ददात भासत नसे. ते वेळीं हल्लीं सारखे असंख्य भिक्षेकरी दृष्टोत्पत्तीस येत नसत.एकंदरीत तो काळ सुकाळाचा असल्या मुळें घरीं कोणी पाहुणा अगर विद्वान आला असतां त्याचा योग्य सत्कार होऊन रवानगी होत असे. आणि त्यांत विशेष प्रेमाचा मनुष्य आल्यास त्यास तर कित्येक दिवस आग्रहानें ठेवून घेतले जात असे. असा प्रकार असले मुळें माझे वडील जेथें जातील तेथूण निदान १०-१५ दिवस झाल्या शिवाय त्यांची रवानगी होत नसे. खाण्या पिण्याची चैन, आदर सत्कार पण प्राप्ती मात्र यथातथाच. .......अपूर्ण

No comments: