Friday, February 20, 2009

किशोर

किशोर हा माझा मित्र वगैरे मुळीच नाही. तो आहे माझ्या धाकट्या भावाचा मित्र. वय वर्षे १८/१९, वयाच्या मानाने एकदम प्रौढ विचार सरणी. त्याचेकडे पाहून मला विलकक्षण आश्चर्य वाटत रहायचे. साधारण उंची,
किरकोळ व कडकडीत शरीरयष्टी असूनही तो लक्षात राहिला कारण त्याच्या शरीरयष्टीला न शोभणारा खणखणीत आवाज, फटकळ पणाच्या जोडीला स्पष्टवक्तेपणा. त्यातच किशोर अत्यंत मनस्वी व नादीष्ट होता.
असा हा किशोर, त्याने कोणतीही गोष्ट मनावर घेतली की, त्याचा तो अगदी तो अतिरेक करीत असे. त्याने एकदा लोकमान्यांचे चरीत्र वाचले. ते वाचून तो अत्यंत प्रभावीत झाला. त्याने ठरवले की काहीही
झाले तरी टिळकांसारखे आधी शरीर कमवायचे व नंतर बाकीच्या गोष्टी! याचा त्याने इतका ध्यास घेतला की, रात्रंदिवस तो व्यायाम करू लागला. सकाळी चार वाजता उठणे, धावायला जाऊन आल्यानंतर दंडबैठका,
सुर्यनमस्कार घालू लागला. दुपारी आरश्यासमोर तास न तास स्वतःचे शरीर न्याहाळू लागला. मुळातच त्याची शरीरयष्टी अशी होती की, तो व्यायाम काय, पण साधा वेगात धावू शकेल की नाही याचीच शंका होती, अर्थात
जे व्हायचे ते झालेच. व्यायामाच्या अतिरेकाने तो इतका आजारी पडला की, पंधरा दिवस अंथरूणातून उठलाच नाही. नंतर वडीलांच्या वाक्बाणांनी तो घायाळ तर झालाच, परंतु त्यापेक्षाही आपण पूर्वीच चांगले पैलवान
होतो या विचाराने तो घायाळ झाला.
त्याच्या नादीष्टपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्याने एकदा बुध्दीबळाचा नाद घेतला. (मैदानी खेळाचा नाद घेण्याचा प्रश्नच नव्हता!) रात्रंदिवस तो कोणाशी ना कोणाशी बुध्दीबळ खेळतांना
दिसायचा. सकाळी उठल्यावरही तोंड न धुता तो कुणालाही आपल्या सोबत खेळण्यासाठी मस्का लावायचा. अर्थात याचाही अतिरेक झालाच. त्याच्या वडीलांची किशोरने आपल्या व्यवसायात हातभार लावावा ही
रास्त अपेक्षा. पण ऐकेल तो किशोर कसला? जेंव्हा कोणीही त्याच्याशी खेळावयास तयार होईना तेंव्हा तो क्षणभर हतबलच झाला. त्याक्षणीच त्याचे डोक्यात थोरांच्या बालपणातील एक प्रसंग चमकला. न्या. रानडे
लहानपणी खांबाला प्रतिस्पर्धी मानून चौसर खेळत. किशोरही मग भिंतीला प्रतिस्पर्धी मानून खेळू लागला. तो प्रकार पाहताच किशोरच्या तीर्थरूपांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी बुध्दीबळाचा तो पटच
चुलीत टाकून दिला व आपले चरणकमल किशोरच्या पार्श्वभागाला लावले. अशा रितीने बुध्दीबळाची इतिश्री झाली.
त्याला वार्ताहार व संपादक होण्याचेही भलतेच वेड होते. मी एक दिवस माझा स्वतःचा पेपर काढीन व संपादक होईल असे तो नेहमी सांगायचा. वार्ताहार होण्यासाठी त्याने जंग जंग पछाडले. त्याला
स्थानीक पातळीवरील साप्ताहीक चालवणाऱ्यांनी सुद्धा उभे केले नाही. त्याला पत्रकारितेचा गंध नव्हता हा काय त्याचा दोष होता. त्याची आपल्या वेड्यावकड्या कविता व असबध्द लेख वर्तमान पत्रात प्रकाशीत
करण्याची इछ्चा अपूर्णच राहीली. मग त्या पेपरची व संपादकाची काही खैर नसावयाची. तो पेपर कसा पक्षपाती आहे व संपादक महोदय कसे नवोदितांना डावलतात यावर तो अर्धा एक तास दात ओठ खाऊन बोलत
असायचा.
किशोर हा देवाचा निस्सीम भक्त होता. त्याची देवावर आंधळी श्रद्धा होती. पण परिक्षेत नापास झाल्यावर मात्र देव्हाऱ्यातील तेच देव फेकण्याचा प्रयत्न केला होता. पण घरच्यांनी वेळीच हे प्रयत्न हाणूण पाडले.
किशोरचे आणखी एक दैवत म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तो नेहमीच बाळासाहेबांसारखा आवाज काढून बोलत असे. त्याच्या सारखेच बोलतांना हातवारे करत असे. कोणी गमतीतही बाळासाहेबांना नाव ठेवलेले त्याला
खपत नसे. तो अतिशय खवळून उठे, बेफाम होई. परंतु त्याची शारीरिक क्षमता अगदीच तोकडी असल्याने त्याचे काहीच चालत नसे. अन्यथा त्याने समोरच्याची येथेच्छ धुलाईच केली असती. छगन भुजबळ जेंव्हा
शिवसेनेतून बाहेर पडले त्यादिवशी तो इतका अस्वस्थ व बेभान झाला होता की, खुद्द शिवसेनाप्रमुख सुध्दा इतके अस्वस्थ झाले नसावेत. त्या दिवशी तो दिवसभर रागाने नुसता थरथरत होता.
किशोरच्या स्वभावाचा आणखी एक पैलू म्हणजे त्याचा स्पष्टवक्तेपणा. त्याचाच हा एक किस्सा. इतका जबरदस्त स्पष्टवक्तेपणा मी अजूनही पाहिलेला नाही. त्याचे असे झाले की, त्याने ठरविले की, कोणाची'
तरी जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करायचीच. मग काय किशोरने कालनिर्णया चाळले. परवाचीच विवेकानंद जयंती निघाली. मग त्याने जय्य्त तयारी केली. जवळच्याच गणेश मंदिराचे सभागृहात जयंती साजरा
करण्याचे निश्चीत केले. टेबल, खुर्च्या, हारतुरे व सतरंजी ह्याचा मोठ्या उत्साहाने सरंजाम केला. एव्हडेच नव्हे तर प्रमुख वक्त्ता, अध्यक्षही त्यानेच निश्चीत केले. समारंभाचे संचालन अर्थातच तो स्वतः करणार होता हे
सांगणे न लागे. एव्हडी सारी तयाती केल्यानंतर जयंतीचा दिवस उजाडला. सकाळीच घरोघरी जाऊन संध्याकाळी सहा वाजता जयंती निमित्त मंदिरात येण्याचे त्याने श्रोत्यांना निमंत्रण दिले. परंतु तो दिवस
शनिवार होता. टी. व्ही. वर चित्रपटाचा दिवस तो! त्याकाळी शनिवारचा चित्रपट घरोघरी पाहीला जायचा. किशोर अध्यक्षांना पाचारण करण्यासाठी त्यांचे घरी गेला. अध्यक्ष महोदय टी. व्ही. पुढे चित्रपट पाहण्यात
गुंग झाले होते. त्याने त्यांना चलण्याची विनंती केली. परंतु 'चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय मुळीच येणार नाही' असे त्यांनी किशोरला साफ शब्दात सुनावले. किशोर भयंकर संतापला. विवेकानंदांच्या जयंती पुढे यांना
या वयातही थिल्लर चित्रपट महत्वाचा वाटावा म्हणजे काय? परंतु त्याने वेळीच संयम बाळगला. चित्रपट संपल्यानंतर अध्यक्ष आले. समारंभ व्यवस्थित आटोपला. शेवटी किशोर आभार प्रदर्शनासाठी उभा राहिला.
प्रथम आभार मानून त्याने विवेकानंदांवर पुन्हा दोन शब्द सांगितले व परत आभार प्रदर्शन सुरू केले. असे करणारा तो बहुदा पहीलाच असावा. शेवटी आभार प्रदर्शनात तो म्हणाला " या सभेला आपण आपली
महत्वाची कामं बाजुला ठेऊन आलात, उदा. टी. व्ही वरील चित्रपट, त्या बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
"विवेकानंदांच्या जयंती समारंभापेक्षा आपणाला या वयात थिल्लर चित्रपट महत्वाचा वाटावा यापेक्षा दुर्दैव ते कोणते?"असे म्हणून त्याने अध्यक्ष महाराजांकडे सहेतूक पाहिले. (अध्यक्षांची काय अवस्था झाली
असेल याची कल्पना तुम्ही करू शकता!) सुदैवाने तेथे फोटोग्राफर उपस्थीत नव्हता आणि त्या ९/१० श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटातच ती सभा संपन्न झाली.........रावसाहेब प्र. देशपांडे
लेखक एका तालुक्याचे ठिकाणी पटवारी असुन त्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने या खात्यातुन हे व्यक्तीचित्र पोस्ट केले आहे.

No comments: