Friday, February 20, 2009

किशोर

किशोर हा माझा मित्र वगैरे मुळीच नाही. तो आहे माझ्या धाकट्या भावाचा मित्र. वय वर्षे १८/१९, वयाच्या मानाने एकदम प्रौढ विचार सरणी. त्याचेकडे पाहून मला विलकक्षण आश्चर्य वाटत रहायचे. साधारण उंची,
किरकोळ व कडकडीत शरीरयष्टी असूनही तो लक्षात राहिला कारण त्याच्या शरीरयष्टीला न शोभणारा खणखणीत आवाज, फटकळ पणाच्या जोडीला स्पष्टवक्तेपणा. त्यातच किशोर अत्यंत मनस्वी व नादीष्ट होता.
असा हा किशोर, त्याने कोणतीही गोष्ट मनावर घेतली की, त्याचा तो अगदी तो अतिरेक करीत असे. त्याने एकदा लोकमान्यांचे चरीत्र वाचले. ते वाचून तो अत्यंत प्रभावीत झाला. त्याने ठरवले की काहीही
झाले तरी टिळकांसारखे आधी शरीर कमवायचे व नंतर बाकीच्या गोष्टी! याचा त्याने इतका ध्यास घेतला की, रात्रंदिवस तो व्यायाम करू लागला. सकाळी चार वाजता उठणे, धावायला जाऊन आल्यानंतर दंडबैठका,
सुर्यनमस्कार घालू लागला. दुपारी आरश्यासमोर तास न तास स्वतःचे शरीर न्याहाळू लागला. मुळातच त्याची शरीरयष्टी अशी होती की, तो व्यायाम काय, पण साधा वेगात धावू शकेल की नाही याचीच शंका होती, अर्थात
जे व्हायचे ते झालेच. व्यायामाच्या अतिरेकाने तो इतका आजारी पडला की, पंधरा दिवस अंथरूणातून उठलाच नाही. नंतर वडीलांच्या वाक्बाणांनी तो घायाळ तर झालाच, परंतु त्यापेक्षाही आपण पूर्वीच चांगले पैलवान
होतो या विचाराने तो घायाळ झाला.
त्याच्या नादीष्टपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्याने एकदा बुध्दीबळाचा नाद घेतला. (मैदानी खेळाचा नाद घेण्याचा प्रश्नच नव्हता!) रात्रंदिवस तो कोणाशी ना कोणाशी बुध्दीबळ खेळतांना
दिसायचा. सकाळी उठल्यावरही तोंड न धुता तो कुणालाही आपल्या सोबत खेळण्यासाठी मस्का लावायचा. अर्थात याचाही अतिरेक झालाच. त्याच्या वडीलांची किशोरने आपल्या व्यवसायात हातभार लावावा ही
रास्त अपेक्षा. पण ऐकेल तो किशोर कसला? जेंव्हा कोणीही त्याच्याशी खेळावयास तयार होईना तेंव्हा तो क्षणभर हतबलच झाला. त्याक्षणीच त्याचे डोक्यात थोरांच्या बालपणातील एक प्रसंग चमकला. न्या. रानडे
लहानपणी खांबाला प्रतिस्पर्धी मानून चौसर खेळत. किशोरही मग भिंतीला प्रतिस्पर्धी मानून खेळू लागला. तो प्रकार पाहताच किशोरच्या तीर्थरूपांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी बुध्दीबळाचा तो पटच
चुलीत टाकून दिला व आपले चरणकमल किशोरच्या पार्श्वभागाला लावले. अशा रितीने बुध्दीबळाची इतिश्री झाली.
त्याला वार्ताहार व संपादक होण्याचेही भलतेच वेड होते. मी एक दिवस माझा स्वतःचा पेपर काढीन व संपादक होईल असे तो नेहमी सांगायचा. वार्ताहार होण्यासाठी त्याने जंग जंग पछाडले. त्याला
स्थानीक पातळीवरील साप्ताहीक चालवणाऱ्यांनी सुद्धा उभे केले नाही. त्याला पत्रकारितेचा गंध नव्हता हा काय त्याचा दोष होता. त्याची आपल्या वेड्यावकड्या कविता व असबध्द लेख वर्तमान पत्रात प्रकाशीत
करण्याची इछ्चा अपूर्णच राहीली. मग त्या पेपरची व संपादकाची काही खैर नसावयाची. तो पेपर कसा पक्षपाती आहे व संपादक महोदय कसे नवोदितांना डावलतात यावर तो अर्धा एक तास दात ओठ खाऊन बोलत
असायचा.
किशोर हा देवाचा निस्सीम भक्त होता. त्याची देवावर आंधळी श्रद्धा होती. पण परिक्षेत नापास झाल्यावर मात्र देव्हाऱ्यातील तेच देव फेकण्याचा प्रयत्न केला होता. पण घरच्यांनी वेळीच हे प्रयत्न हाणूण पाडले.
किशोरचे आणखी एक दैवत म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तो नेहमीच बाळासाहेबांसारखा आवाज काढून बोलत असे. त्याच्या सारखेच बोलतांना हातवारे करत असे. कोणी गमतीतही बाळासाहेबांना नाव ठेवलेले त्याला
खपत नसे. तो अतिशय खवळून उठे, बेफाम होई. परंतु त्याची शारीरिक क्षमता अगदीच तोकडी असल्याने त्याचे काहीच चालत नसे. अन्यथा त्याने समोरच्याची येथेच्छ धुलाईच केली असती. छगन भुजबळ जेंव्हा
शिवसेनेतून बाहेर पडले त्यादिवशी तो इतका अस्वस्थ व बेभान झाला होता की, खुद्द शिवसेनाप्रमुख सुध्दा इतके अस्वस्थ झाले नसावेत. त्या दिवशी तो दिवसभर रागाने नुसता थरथरत होता.
किशोरच्या स्वभावाचा आणखी एक पैलू म्हणजे त्याचा स्पष्टवक्तेपणा. त्याचाच हा एक किस्सा. इतका जबरदस्त स्पष्टवक्तेपणा मी अजूनही पाहिलेला नाही. त्याचे असे झाले की, त्याने ठरविले की, कोणाची'
तरी जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करायचीच. मग काय किशोरने कालनिर्णया चाळले. परवाचीच विवेकानंद जयंती निघाली. मग त्याने जय्य्त तयारी केली. जवळच्याच गणेश मंदिराचे सभागृहात जयंती साजरा
करण्याचे निश्चीत केले. टेबल, खुर्च्या, हारतुरे व सतरंजी ह्याचा मोठ्या उत्साहाने सरंजाम केला. एव्हडेच नव्हे तर प्रमुख वक्त्ता, अध्यक्षही त्यानेच निश्चीत केले. समारंभाचे संचालन अर्थातच तो स्वतः करणार होता हे
सांगणे न लागे. एव्हडी सारी तयाती केल्यानंतर जयंतीचा दिवस उजाडला. सकाळीच घरोघरी जाऊन संध्याकाळी सहा वाजता जयंती निमित्त मंदिरात येण्याचे त्याने श्रोत्यांना निमंत्रण दिले. परंतु तो दिवस
शनिवार होता. टी. व्ही. वर चित्रपटाचा दिवस तो! त्याकाळी शनिवारचा चित्रपट घरोघरी पाहीला जायचा. किशोर अध्यक्षांना पाचारण करण्यासाठी त्यांचे घरी गेला. अध्यक्ष महोदय टी. व्ही. पुढे चित्रपट पाहण्यात
गुंग झाले होते. त्याने त्यांना चलण्याची विनंती केली. परंतु 'चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय मुळीच येणार नाही' असे त्यांनी किशोरला साफ शब्दात सुनावले. किशोर भयंकर संतापला. विवेकानंदांच्या जयंती पुढे यांना
या वयातही थिल्लर चित्रपट महत्वाचा वाटावा म्हणजे काय? परंतु त्याने वेळीच संयम बाळगला. चित्रपट संपल्यानंतर अध्यक्ष आले. समारंभ व्यवस्थित आटोपला. शेवटी किशोर आभार प्रदर्शनासाठी उभा राहिला.
प्रथम आभार मानून त्याने विवेकानंदांवर पुन्हा दोन शब्द सांगितले व परत आभार प्रदर्शन सुरू केले. असे करणारा तो बहुदा पहीलाच असावा. शेवटी आभार प्रदर्शनात तो म्हणाला " या सभेला आपण आपली
महत्वाची कामं बाजुला ठेऊन आलात, उदा. टी. व्ही वरील चित्रपट, त्या बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
"विवेकानंदांच्या जयंती समारंभापेक्षा आपणाला या वयात थिल्लर चित्रपट महत्वाचा वाटावा यापेक्षा दुर्दैव ते कोणते?"असे म्हणून त्याने अध्यक्ष महाराजांकडे सहेतूक पाहिले. (अध्यक्षांची काय अवस्था झाली
असेल याची कल्पना तुम्ही करू शकता!) सुदैवाने तेथे फोटोग्राफर उपस्थीत नव्हता आणि त्या ९/१० श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटातच ती सभा संपन्न झाली.........रावसाहेब प्र. देशपांडे
लेखक एका तालुक्याचे ठिकाणी पटवारी असुन त्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने या खात्यातुन हे व्यक्तीचित्र पोस्ट केले आहे.

Tuesday, February 3, 2009

वांका Vanka Author: Anton Chekhov

नाताळाच्या पुर्वसंधेला मध्यरात्रीच्या प्रार्थनेला गेलेले मालक, मालकीण आणि त्यांचे कामगार यांची वाट बघत जागत बसलेला नऊ

वर्षांचा वांका साधारण तिन महिन्यांसाठी काम शिकावयास अल्याहीन चांभाराकडे आला होता. त्याने मालकाच्या कपाटातून एक दौत, गंजलेली निब असणारा एक टाक काढला व चुरगळलेला एक कागद आपल्या पुढे पसरवत त्याने लिहीण्यास सुरुवात केली.

पहीले पत्र लिहीण्याआधी त्याने बरेचदा घाबरून जाऊन खिडक्या व दारावर नजर फिरविली, दोन्ही बाजूस ऐरणीने भरलेली कपाटे असणाऱ्या अंधाऱ्या आकृतीवर एक दृष्टीक्षेप टाकला व एक उसासा टाकला. कागद एका बाकावर ठेवून व तो स्वतः गुढग्यांवर टेकला होता.

"प्रिय आजोबा, कॉनस्टॅंटीन मार्कारीच," त्याने लिहीले, " मी तुम्हाला हे पत्र लिहीतोय. तुम्हाला नाताळाच्या हार्दीक शुभेच्छा आणि ईश्वर तुम्हला सुखी ठेवो ही प्रार्थना. मला आई नाही किंवा बापही नाही, तुमच्या शिवाय माझे कोण आहे?

मेणबत्तीच्या उजेडात दिसणाऱ्या त्या काळ्याभोर आकृतीकडे वांका पाहू लागला आणि झिवारेव्ह परीवाराकडे चौकीदार असणारे त्याचे आजोबा, कॉनस्टॅंटीन मार्कारीच , त्याला स्पष्टपणे आठवले.

हा वयाची पासस्टी गाठलेला सडपातळ प्रकृतीचा पण अतीशय चपळ, आनंदी, सदा हसतमुख व झिंगलेले डोळे असणारा पण उंचीने लहान असा मानूष्य होता. दिवसा तो कर्मचाऱ्यांच्या स्वैपाकघरात निजायचा, किंवा आचाऱ्यांसोबत तो थट्टा-मस्करी करत असे; रात्री अंगावर शेळीच्या कातडीचे घोंगडे व्यवस्थीतपणे गुंडाळून तो लाकडी हातोडा आपटत मैदानात फिरत असे.

काशतांका व एल, त्याच्या काळ्याभोर रंगामुळे व विझल सारख्या लांब शरीरामुळे डोके हलवीत त्याचे मागे मागे जात होते.

आत्ता या वेळी आजोबा नक्कीच त्यांचे उंच टाचांचे जोडे घालून, चर्चच्या लाल खिडक्यांकडे डोळे लावून फाटकात उभे असतील, व नौकरांसोबत थट्टा मस्करी करत असतील. त्यांचा छोटा लाकडी हातोडा कमरेला लोंबत असेल. त्यांनी हाताची घडी केली असेल व थंडीने खांदे उडवून स्मित करत आधी स्वैपाकीण व मग स्वैपाक्याला चिमटे काढत असतील.

तपकीरीची डबी त्या बाईपुढे करत "एकदा तपकीर ओढणार काय?" ते म्हणत असतील. ती बाई तपकीर ओढेल व जोरदार शिंकेल. आजोबांना मनापासुन हासु होईल, ते हासतच सांगतील: "ते पुसून टाक नाहीतर गोठून जाईल."

ते कुत्रयांना सुद्धा सुंघण्यासाठी तपकीर देतात. काश्तान्का शिंकतो, चुळबुळ करून डोके हलवीतो व रागावून निघुन जातो. शांत स्वभावामुळे एल शिंकत नाही पण सारखे शेपूट हलवत असतो. आणि वातावरण खुपच छान आहे. वारा शांत, ताजा व पारदर्शक आहे. रात्र अंधारी आहे पण पांढरी छपरे, धुरांचे लोट सोडणारी धुरांडे, बर्फाच्छादीत झाडे, आणि बर्फाचे ढिगारे कुणालाही सहज दिसू शकतात. संपूर्ण आकाश चमकणाऱ्या ताऱ्यांनी सुशोभीत झाले आहे, आणि पांढरा पथ जणू काही बर्फाने घासून-धुवून घेतला आहे.

वांकाने एक उसासा टाकून टाक शाईत बुडवला व लिहू लागला: "काल माझी खुप खरडपट्टी काढण्यात आली. मालकाने माझे केस धरून मला अंगणात खेचून आणले व मला जोडे सरळ करण्याच्या काठीने खुप बदडले कारण त्यांचे मुलाला पाळण्यात झोका देतांना अनावधानाने माझा डोळा लागला.

एका आठवड्यापूर्वी मालकिणीने मला हेरींग मासा स्वच्छ करण्यास सांगितले, आणि मी शेपटा पासून सुरुवात केली, तिने मासा घेतला व त्याचे डोके माझ्या तोंडात घुसवले. कामगार मला हसु लागले आणि त्यांनी मला व्होडक्यासाठी खानावळीत पाठवले, व मला त्यांचेसाठी मालकाच्या काकड्या चोरायला सांगितले, आणि मालक मला त्याचा हातात जे सापडेल त्याने मारत असतो.

आणि येथे खाण्यासाठी काहीच नसते. सकाळी ते मला एक पाव देतात, रात्रीच्या वेळी लापशी व संध्याकाळी पुन्हा पाव; पण चहा किंवा सुपाचे म्हणाल तर मालक व मालकीन स्वतःच सगळेच मटकावतात.

मला एका कडेला झोपवले जाते, जेव्हा त्यांचे ते व्रात्य मुल रडायला लागते, त्यावेळी मला त्याला झोका द्यावा लागतो, तेंव्हा मला थोडेही झोपता येत नाही. प्रिय आजोबा, माझ्यावर कृपा करा, मला येथून घेऊन जा, गावातल्या घरी. माझ्या सहनशक्तीच्यापेक्षा आता हे खुप जास्त झाले आहे. मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या करता देवाला नित्य प्रार्थना करेन. मला येथुन घेऊन जा नाहीतर मी मरून जाईन.

वांकाने तोंड उघडले, त्याने त्याचे डोळे त्याच्या मुठांच्या काळ्या तळव्यानेच पुसले, व एक हुंदका दिला.

"मी तुम्हाला तुमची तपकीर भरून देईन," तो लिहू लागला मी तुमच्या करता देवाला प्राथना करेन, आणि जर मी केले नाही तर तुम्ही मला सिडर्च्या शेळीसारखा चोप देऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटले की मला काहीच काम नाही तर मी दिवाणजीला त्यांचे जोडे मला स्वच्छ करू देण्याची परवानगी देण्याची भिक मागेन, किंवा मी फेडकाच्या ऐवजी मेंढपाळ म्हणून काम करेन. प्रिय आजोबा, मी हे सहन करू शकण्यापलीकडचे आहे; येथे खरच काही जगण्यासारखे उरले नाही. मला गावी पळून जायचे होते पण माझ्याकडे पायातले जोडे नाहीत व मला गोठण्याची भीती वाटते.

मोठा झाल्यावर मी याबदल्यात तुमची काळजी घेईन, तुम्हाला कुणीच त्रास देणार नाही याची खबरदारी घेईन, आणि तुम्ही मरण पावल्यावर तुमच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, माझ्या आई प्रमाणेच मी तुमच्या करता प्रार्थना करेन.

मॉस्को खुप मोठे शहर आहे. येथे सर्व सदगृहस्थांची घरे आहेत, आणि येथे खुप घोडे आहेत, पण येथे मेंढ्या नाहीत, आणि कुत्री खुनशी नाहीत.

आणि मी एक दुकान बघीतले, त्यात सर्व प्रकारच्या बंदुका होत्या, मालकाच्या घरी असणाऱ्या बंदुकीप्रमाणे असल्याने जर एक बंदूक हजार रुबल्सची असेल तर मला आश्चर्य वाटायला नको....आणि खाटकाच्या दुकानात मांस, वुडकोक व मासे व ससे आहेत, पण दुकानदार सांगत नाही की ते त्यांना कुठे मारतात.

"प्रिय आजोबा, जेंव्हा ते मोठ्या घरांतून नाताळाचे झाड आणतील तेंव्हा मला एक सोनेरी वॉलनट आणुन द्याल, आणि हिरव्या पेटीत बाजूला ठेवून द्या. ओल्गा ला सांगा की हे वांका साठी आहे.

वांकाने दुःखी होऊन एक उसासा दिला, आणि पुन्हा खिडकीत पाहू लागला. त्याला आठवले की त्याचे आजोबा कसे त्यांच्या मालकासाठी नाताळाचे झाड आणायला रानात जात, व त्यांच्या नातवाला सोबत नेत असत.

तो आनंदाचा काळ होता. आजोबा घशातून आवाज काढत, त्या आवजाने अरण्य हादराचे, व वांका कडे बघुन ते हसायचे.

झाड कापण्यापूर्वी आजोबा चिलीम ओढत असत, हळुच थोडी तपकीर ओढत, आणि घाबरलेल्या वांका कडे बघुन हसत. नवीन फराची पांढऱ्या शु्भ्र बर्फाने आच्छादलेली झाडे, हालचाल न करता आपल्या पैकी कोण मरणार याची वाट उभी राहत.

नाताळाचे झाड कापून झाल्यावर आजोबा ते खेचून बंगल्यात नेत, आणि तेथे सजावटीला सुरुवात करत असत.

सर्वात सुस्वरुप असणारी ती तरूण स्त्री, ओल्गा, वांकाची आवडती होती. जेंव्हा वांकाची आई पिलागिया जिवंत होती व बंगल्यात कामावर होती, त्यावेळी ओल्गा त्याला खायला द्यायची, काही विशेष काम नसल्याने तीने त्याला, वाचन, लिखाण, शंभर पर्यंत उजळणी, आणि नाचायला सुध्दा शिकवले.

जेंव्हा पेलागेया मरण पावली, वांकाला आपल्या आजोबांकडे नोकरांच्या स्वैपाकघरात पाठवण्यात आले, आणि तेथून मॉस्कोला चांभाराकडे.

"आजोबा, नक्की या." वांका पत्र लिहू लागला. "देवासाठी मी तुम्हाला भीक मागतो, मला घेऊन जा. माझ्यासारख्या दुःखी अनाथावर दया करा; इथे सर्वजण माझी हेटाळणी करतात, आणि मी खुप भुकेला आहे, मी तुम्हाला माझे हाल सांगू शकत नाही, मी नेहमी रडत असतो. आणि त्यादिवशी मला मालकाने डोक्यात ऐरणीने मारले, म्हणून मी खाली पडलो. माझे आयुष्य खुप हालाकीचे आहे, एखाद्या कुत्र्यापेक्षा सुद्धा हे वाईट आहे.... माझ्या ऍल्योना, एक डोळा असणाऱ्या येगोरका, कोचमन ला शुभेच्छा, आणि माझे कॉन्सर्टीना वाद्य कुणालाही देऊ नये. तुमचा नातू, इव्हान झुकोव्ह. प्रिय आजोबा, नक्की या."

वांकाने कागदाची दोनदा घडी घातली आणि त्याने एका कोपेकला (पैसा) आणलेल्या एका पाकीटात तो घातला....नंतर थोडा विचार करून, त्याने टाक शाईत बुडवला व पत्ता लिहिला: प्रती खेडेगावातील आजोबा.

त्यानंतर त्याने त्याचे डोके खाजवले, थोडा विचार केला आणि आणखी लिहीले: कॉनस्टॅंटीन मार्कारीच. लिहीतांना काहीच अडथळा आला नसल्याच्या आनंदात त्याने आपली टोपी घातली, आणि कोट न घालताच त्याने अंगातल्या शर्टावरच रस्त्याकडे धाव घेतली....

आधल्या दिवशीच एका खाटीकाला विचारल्यावर त्याने त्याला सांगितले होते की पत्रे पोष्टाच्या पेटीत घातली जातात, आणि तेथून घंटी असणाऱ्या व प्यायलेले चालक असणाऱ्या पत्रांच्या गाड्यांनी ती जगभर पोहचवली जातात. वांका जवळच्याच एका पत्रपेटी कडे धावला आणि त्याने ते मौल्यवान पत्र खिंडीतून पत्र पेटीत घातले.

तासाभरातच, गोड आशांच्या स्वप्नानी तो गूंगला, तो गाढ झोपी गेला होता.... त्याने स्वप्नात एक चुल पाहीली. त्या चुलीजवळ पाय हलवत हलवत शेकत बसलेले त्याचे आजोबा ते पत्र स्वैपाक्यांना वाचून दाखवत होते.

त्या चुली जवळ एल आपले शेपूट हलवत बसला होता.

समाप्त