Wednesday, August 20, 2008

रूपाली

मी साधारणपणे चौथ्या वर्गात असतांना ती एका गुरुवारी आमच्या घरी आली. त्याआधी माझे वडील व मी तिला बघायला गेलो होतो. त्यावेळी तिचे रुप बघून वडिलांच्या तोंडून "रूपाली" असे सहजच निघून गेले. ती खरेच रूपाली होती. डोळ्यात भरणारी शरीरयष्टी, मोठी बाकदार शिंगे व वर्ण पांढरट पण शुभ्र पांढरा नाही. क्षणभर असे वाटायचे की ही कामधेनू तर नाही ना! रूपालीचे आगमन आमच्या घरी अगदी थाटात झाले होते. ती येणार त्या दिवशी नानांनी गोठा स्वच्छ करुन ठेवला होता. नवीन साखळी, वेसण, टोपले, एक सरकीचे पोते, पाण्याची व्यवस्था असे सर्व काही तयार करुन ठेवले होते. आजीने तिच्यासाठी बिस्किटे (आम्हा मुलांच्या भाषेत) बनवून ठेवली होती. बिस्किटे म्हणजे कणकेच्या गूळ भरुन केलेल्या आठ दहा गोळया.

आमचा गुराखी एकनाथ व नाना त्या संध्याकाळी तिला घरी घेऊन आले. त्यावेळी आईने गोठयाच्या दारातच तिचे औक्षण करुन स्वागत केले. आम्ही सर्व खूप खुष होतो. त्या नंतर मी व माझ्या धाकट्या बहिणीने बराच वेळ गोठयात रूपालीला न्याहाळण्यात घालवला. ती बहुधा अनोळखी माणसांपासून दूरच राहणे पसंत करीत असे. पण लवकरच घरातील प्रत्येकाशी तिची नाळ कुठल्या तरी प्रकारे पक्की जुळली. हळूहळू रूपाली आमच्या घरातील एक सदस्य व आमच्या दिनचर्येचा भाग बनून गेली. नाना रोज तिला मोठ्या प्रेमाने चारा व सरकी घालत असत. आजोबा तिला दोन्ही वेळी पिण्यास पाणी देत. ती बाहेरील आहाळाचे पाणी पित नसे. आजी दररोज तिला गोग्रास देत असे. आईचे काम म्हणजे तिला सकाळ-संध्याकाळ तिला गोमाता म्हणून नमस्कार करून दूधदुभत्याची काळजी घेणे. आम्ही मुले मनात येईल तेव्हा तिला चारा घालत असू. दोहनाचे काम नानांचे होते. याशिवाय दर रविवारी नेमाने नाना गरम पाण्याने, साबणसुबण लावून तिला आंघोळही घालत असत. दूध काढण्यामुळे त्यांचे हात कधीकधी दुखत असत. पण त्यांचे हे आवडते काम होते. आम्हा सर्वांना रूपालीच्या दुधाची इतकी गोडी लागली होती की आम्ही कधीही बाहेरचे दूध घेत नव्हतो.

रूपालीसोबत आमच्या अनेक आठवणी निगडित आहेत. नाना संध्याकाळी घरी पोहोचत असताना त्यांच्या फटफटीच्या आवाजानेच तिला त्यांच्या येण्याची चाहूल लागायची व ती मोठ्याने हंबरायची. सुदृढ जनावरांच्या स्पर्धेत तिला अनेक वेळा पहिला किंवा दुसरा पुरस्कार मिळाला होता. रूपालीच्या सात-आठ वर्षांच्या वास्तव्यात तिला फक्त एकदाच गोऱ्हा झाला, ह्याचा आम्हाला विशेष अभिमान होता. इतर वेळी कालवडीलाच तिने जन्म दिला. तिच्यामुळे नानांना सतत व्यग्र राहावे लागे व ती आता थोडी थकलीही होती. तिला चरायला रोज रानात पाठवण्यापेक्षा शेतातच ठेवणे इष्ट आहे, असा विचार आजोबांनी मांडला. त्यातल्या त्यात नानांना रूपालीत गुंतून गेल्यासारखे झाले होते. कुठेही परगावी जाणे शक्य होत नसे. कुठल्याही कार्यास नाना हे नसणारच हे गृहीत धरून आमचेच काही जवळचे नातेवाईक म्हणत असत, "नाना गेलाच नसेल ना कार्याला. कारण काय तर म्हणे त्याची गाय." एकंदरीत काय तर अखेर तिला नानांच्या एका मित्राकडे देण्याचा व त्यांच्या शेतात ठेवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला. तिला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. कल्पना असणे कसे बरे शक्य होते?
एके दिवशी सकाळी तिची पूजा करुन व तिला तिची आवडती बिस्किटे देऊन तिच्या वासरासोबत रानात चरण्यासाठी रवाना करण्यात आले. ठरल्याप्रमाणे गुराख्याने संध्याकाळी तिला त्या शेतात नेऊन सोडले. त्या ठिकाणी नाना, मी व माझी बहीण अगोदरच पोहचलो होतो. त्यांच्या गड्याने तिला तेथे थोडा चारा देऊन दावणीला बांधले. तिला बांधल्यावर मात्र तिच्या लक्षात आले की येथे काहीतरी गडबड आहे. तिने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्रयत्न व्यर्थच ठरणार होते. तिला आता सर्व कळले होते. तिच्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या. तिच्या या तगमगीकडे बघून तिच्यासोबत बांधून ठेवलेले तिचे वासरुसुद्धा अस्वस्थ होऊन वेड्यावाकड्यावा उड्या मारु लागले. नानांनाही ते दृष्य बघवत नव्हते. त्यांची पावले जड झाली. थोडावेळ रेंगाळून अखरे ते निघाले व फटफटी सुरु केली. आणि त्या आवाजाने रूपालीचा बांध फुटला व तिने असा काही हंबरडा फोडला की नानांना दुचाकी पुढे रेटणे अशक्यच झाले होते. गाडी बंद करुन ते उतरले आणि त्यांनी रूपालीजवळ जाऊन तिच्या पाठीवरूनन हात फिरवला, पाठ थोपटली. आता ती शांत झाली होती. पण नाना खूप भावनाविवश झाले होते. मग त्यांचेच मित्र म्हणाले की, नाना तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिची खूप काळजी घेऊ. ती आमची लक्ष्मी आहे हो! या बोलण्याने नानांना दिलासा मिळाला व आम्ही तिथून निघालो. दुचाकी सुरु करताच रूपाली पुन्हा हंबरावयास लागली. माझ्या धाकट्या बहिणीने नानांना विचारले की ती अशी का करतेय? यावर ते म्हणाले की ती म्हणते की मला एकटे सोडून जाऊ नका. मी इथे राहणार नाही. पण मी तिला सांगितले आहे की आम्ही लवकरच तिला भेटायला पुन्हा येणार आहोत.

यानंतर नानांच्या त्या मित्राचा गडी दररोज सकाळी रूपालीचे दूध आमच्या घरी आणून देऊ लागला. आम्ही नेहमीच त्याचेकडे तिची व वासराची चौकशी करायचो. त्यानंतर नाना बरेचदा तिला भेटायला तिच्या आवडीची बिस्किटे घेऊन जात असत. एका वर्षाने गड्याचे दूध आणणे बंद झाले. त्यानंतर मी व माझ्या बहिणीने दूध घेणे सोडले ते कायमचेच. पण नानांचे तिला शेतात जाऊन भेटणे काही थांबले नाही. दरम्यान तिला आणखी एक कालवड झाल्याचेही आम्हाला कळले. दोन वर्षांनी एके दिवशी शेतातून निरोप आला की आज सकाळीच रूपाली आजारपणाने देवाघरी गेली. हे ऐकून माझ्या छातीत धस्स झाले. त्या संध्याकाळी घरी कुणीही जेवले नाही. आमच्या घरातील एक महत्वाचा सदस्यच आता पुन्हा आम्हाला कधीही भेटणार नव्हता ना!

3 comments:

Unknown said...

Very touching article,try to publish it in newspaper.

Anonymous said...

Animal also love human because human take care of animals. There are so many such stories. I liked it.

Unknown said...

I got very emotional while reading this article. I think the name of this article should be MAYA