माझे एक सहकारी कित्येकदा ऑफिसातले दुपारचे जेवण बाहेरुन विकत आणतात किंवा बाहेरच्या एखाद्या पोळी-भाजी केन्द्रावरुन ते पोळी-भाजी (पार्सल) आणत असतात. माझे कार्यालय ज्या भागात आहे त्या भागात अशी पोळी-भाजी केन्द्रे बरीच आहेत. एकदा आम्ही भर उन्हाळ्यात दुपारी दोनच्या सुमारास त्या सहकाऱ्यासाठी काही तरी जेवणाचे घेऊन यावे या उद्देशाने आमच्या एका प्रोजेक्टबद्दल बोलत बोलत मावशीबाईंच्या गाडी कडे गेलो व "एक पोळी-भाजी पार्सल!" असे मावशीबाईस फर्मावले. तेथे दुपारचे भोजन घेणाऱ्यांची चांगलीच रेलचेल होती.
सहजच बाजूला नजर गेली तर एक विदारक दृश्य नजरेस पडले. रस्त्यावर केर, कचरा, भंगार असे जमा करणारी दोन मुले मावशीबाईच्या गाडीच्या शेजारीचच बसून काहीतरी करत असतांना जाणवली. त्यांच्या बाजूलाच त्यांची नायलॉनची पोती पडली होती व जवळच खरकटी ताटं, प्लेटा एकावर एक रचून ठेवली होती. अंदाजे पन्नास ताटं होती तेथे. ही दहा-बारा वयोगटाली मुले त्या ताटांच्या ढिगार्यातले सर्वात वरचे एक ताट हाती घ्यायची आणि मग त्या ताटातले उरलेले अन्न हळूच खाऊन ते ताट स्वच्छ करुन टाकायची.
जर एखाद्या ताटात जरासे जास्त उरलेलं अन्न असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळायचा. ज्याच्या वाट्याला ते जास्त अन्न असणारे ताट आले आहे तो आनंदी व्हायचा तर दुसरा हिरमुसून दुसऱ्या ताटाकडे अपेक्षेने वळायचा. जर एखादा गोड पदार्थ मिळाला तर ते दोघे तो वाटून खायची. असे करत करत त्यांनी त्या ढिगाऱ्याजवळ बसून जवळपास सर्व ताटे स्वच्छ केली. त्यानंतर ती दोन्ही मुले जवळच असणाऱ्या एका कचऱ्याच्या कुंडी कडे वळली. त्यात लोकांनी ताक पिऊन नंतर फेकून दिलेले प्लास्टिकचे प्याले होते.
ह्या दोघांनी मग त्या प्याल्यातले थोडे फार उरलेले ताक घेण्यास सुरुवात केली. एक-दोन प्याले अर्धवट भरलेले होते, त्यातील ताक घेऊन त्यांना कोण आनंद झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून कुणालाही कळले असते. हे सर्व बघताना मी शून्यात गेलो होतो व माझ्या मनात एक अनामिक हुरहूर सुरू झाली होती.
इतक्यात त्यांच्यापैकी एकाच्या लक्षात आले की मी त्यांच्या कडे टक लावून बघतोय. त्यामुळे तो अचानक उठला व बाजूला झाला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते. मी त्याला जवळ जाऊन विचारले की विकत घेऊन चांगले अन्न का खात नाहीस बेटा तू? तुझ्याकडे पैसे नसतील तर मी तुला घेऊन देईन! त्यावर त्याने संगितले की तो असे करु शकत नाही. तो दिवसा भंगार, बाटल्या, प्लास्टीकच्या पिशव्या इत्यादी जमा करुन ते संध्याकाळी व्यापाऱ्यास विकतो. त्यानंतर त्यास रोज संघ्याकाळी “भाऊ” ला साठ रुपये (१० च्या सहा नोटा!) द्यावे लागतात. त्यापैशांच्या मोबदल्यात भाऊ त्याला वस्तीवर राहू देतो व रात्रीला थोडे खाण्यास देतो. बरेचदा तेवढे पैसे जमा होत नाहीत, त्यामुळे भाऊची माणसे मार देतात व छळ करतात. तेथील जेवण तुमच्या इथल्या जेवणासारखे नसतं, ते खाण्याची आम्हाला इच्छा होत नाही. येथील अन्न आम्हास खावंसं वाटतं, पण येथे वीस रुपये लागतात. तेवढे पैसे असूनसुद्धा त्या साठ रुपयांसाठी आम्ही खर्च करु शकत नाही, अन्यथा रात्रीला खूप मार खावा लागेल.
हे सर्व सुन्न करणारे होते.
मी मावशीबाईस त्यांच्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की ही व अशी इतर काही मुले येथे बरेचदा येत असतात पण त्या त्यांचेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. कारण त्यांना हटकले तर ती मुले पुन्हा येणार नाहीत व जे काही आहे ते सुद्धा त्यांच्या पोटात जाणार नाही. हे सर्व धक्कादायक होते. मी बधिर झालो! त्या दोघांना निदान आज तरी चांगले जेवण द्यावे म्हणून मी खिशात हात घातला, बघतो तर पाकिटात पाचच रुपये होते... मला आठवले की एका मित्रास सकाळीच आपण सर्व पैसे दिले होते! त्यामुळे त्या दोघांसाठी दोन थाळ्या घेणे शक्य नव्हते. मनात विचार आला की त्यांच्या नशिबात चांगले जेवण नाही की आपल्या नशिबात त्यांना चांगले जेऊ घालणे नाही? शक्यत्या मार्गाने पैसे कमाऊन सुद्धा ही मुले आपल्या मनाप्रमाणे का बरे नाही खाऊ शकत? येथे लोक आपापल्या ताटात अन्न टाकून देतात ते योग्य की अयोग्य ? या सर्वांमध्ये दोष कुणाचा ?
इतक्यात माझ्या सहकाऱ्यांनी हाक दिली. मी ती मुले, भाऊ, भूक, पैसा, मावशीबाई, दैव, देव ? असे व इतर अनेक विचार करत एक एक पाऊल जड अंतःकरणाने टाकु लागलो. त्यादिवशी मी काही माझ्या डब्यातले अन्न खाऊ शकलो नाही. आणि मी ठरवले की यापुढे ताटात कधीही अन्न टाकून द्यायचे नाही. देशातली किती तरी लहान मुले रोज पोटभरुन जेवू शकत नाहीत!!! त्याच प्रमाणे मी असाही नेम केला की आपल्या रोजच्या जेवणातील थोडा भाग गरजुंसाठी राखून ठेवीन व त्यांच्यापर्यंत तो पोहचवण्याची व्यवस्था करीन.
Monday, August 18, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Excellent work..Keep it up.
Post a Comment