अंतोन चेकॉव्ह यांच्या ’द कोरस गर्ल’ या लघूकथेचे स्वैर मराठी रुपांतर करण्याचा प्रयत्न:-
त्या दिवशी ती तरुण व साजरी दिसत होती, आणि तिच्या आवाजातही चांगलाच कणखरपणा होता. तेव्हा निकोल्ये पिट्रोवीच कॉलपाकोव्ह, तिचा प्रियकर, तिच्या .....टुमदार अशा उन्हाळी घराच्या ओसरीवर पडून होता. त्यावेळच्या असह्य उकाड्याने जीव गुदमरत होता. कॉलपाकोव्हने नुकतेच जेवण करून मद्याची एक अख्खी बाटली रिचवली होती. तो वैतागलेला आणि उदासवाणा झाला होता. ती दोघेही कंटाळली होती आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी ऊन उतरण्याची वाट बघत होती.
अशांत अचानकच दार ठोठावण्याचा आवाज आला. कॉलपाकोव्ह आपला कोट काढलेला होता व त्याच्या पायात घरात वापरावयाच्या वहाणा होत्या. त्या अवस्थेतच तो उडी घेऊन उभा राहिला व त्याने पाशाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. "पोष्टमन किंवा मुलींपैकीच एखादी असेल," ती गायिका म्हणाली.
कॉलपाकोव्हला पोष्टमन किंवा पाशाच्या मैत्रिणींकडून पकडले जाण्याची मुळीच पर्वा नव्हती, पण काळजीचा भाग म्हणून त्याने आपले कपडे गोळा केले व तो बाजूचा खोलीत गेला आणि पाशा दार उघडण्यासाठी धावली. महद आश्चर्य म्हणजे दारात पोष्टमन किंवा मैत्रीण नाही, पण घरंदाज वाटेल अशी एक अज्ञात, तरुण व सुंदर स्त्री उभी होती.
ती अपरिचिता एकदम पांढरी पडलेली होती आणि एखाद्या उंच जिन्याच्या पायऱ्या धावत धावत चढून आल्यागत जोराने श्वास घेत होती.
"काय आहे?" पाशाने विचारले.
ती स्त्री लगेचच काही बोलली नाही. तिने एक पाऊल पुढे टाकले, सावकाशपणे खोलीत बघितले, व मटकन खाली बसली. तिचे बसणे सुचवत होते की थकव्यामुळे, किंवा आजारपणामुळे ती उभी राहू शकत नव्हती. त्यानंतर बराच वेळ तिचे नीर्जीव ओठ बोलण्याच्या अकारण प्रयत्नांत नुसते थरथरत होते.
"माझा नवरा येथे आहे का?" ओल्या पापण्या असणारे तीचे मोठ्ठे डोळे पाशाचे दिशेने वर करून तिने अखेरीस विचारले.
"नवरा?" पाशा पुटपुटली, आणि अचानकच इतकी घाबरली की तिचे हात पाय गार पडले. "काय नवरा?" ती पुन्हा उद्गारली आणि थरथर कापायला लागली.
"माझा नवरा,... निकोल्ये पिट्रोविच कॉल्पाकोव्ह."
"न...नाही, बाई.....मला...मला कोणताच नवरा माहीत नाही."
एक मिनिट शांतता पसरली. त्या नवख्या व्यक्तीने बरेचदा तीचा रुमाल पांढऱ्या ओठांवरुन फिरवला आणि तिचा आंतरिक कंप थांबवण्यासाठी क्षणभर श्वास रोखला. पाशा तीच्या समोर एखाद्या खांबा प्रमाणे अगदी स्तब्ध उभी राहिली आणि तीच्या कडे आश्चर्य व भितीने पाहू लागली.
"तर तू म्हणतेस की तो इथे नाही?" यावेळी विश्वासात्मक स्वरात व कुत्सीतपणे हसून ती स्त्री म्हणाली.
"मला...मला माहीत नाही तो कोण आहे ज्याबद्दल तू विचारते आहेस"
"तू भीषण, क्षुद्र आणि घाणेरडी आहेस,"पाशाला द्वेष व तिटकाऱ्याने न्याहाळत ती अपरिचिता पुटपुटली. "होय, होय...तू भीषण आहेस. मी खूप, खुप आनंदी आहे की मी कमीत कमी हे तुला सांगू शकते"
पाशाला वाटले की काळे वस्त्र परिधाने केलेल्या, रागावलेले डोळे व पांढरी लांब सडक बोटे असणाऱ्या या स्त्रीला आपण काहीतरी भीषण आणि असभ्य वाटतो, आणि तिला तिच्या गुबगुबीत लाल गालांची, नाकावरच्या गोंदकामाची व कपाळावर रुळणाऱ्या कधीही न विंचरल्या जाणाऱ्या बटांची लाज वाटू लागली. आणि तिला असे वाटू लागले की जर ती बारीक असती, आणि तिच्या चेहऱ्यावर पावडर फासलेली नसती व कपाळावर केसांच्या बटा नसत्या तर ती आदरणीय व्यक्ती नाही ही वस्तुस्थिती ती धुडकावून लावू शकली असती, आणि तिला त्या अपरिचित व अगम्य स्त्रीची इतकी भिती व लाज वाटली नसती.
"माझा नवरा कुठे आहे?" ती बाई बोलू लागली. "तो इथे आहे की नाही याची मला पर्वा नाही, पण मी हे तुला सांगितलेच पाहिजे की पैशांचा अपहार झाला आहे, आणि ते निकोल्ये पिट्रोवीच ला शोधताहेत....ते त्याला गजाआड करणार आहेत. ही तुझीच करणी आहे!"
ती स्त्री उभी राहिली आणि त्या खोलीकडे अत्यंत त्वेषात चालू लागली. पाशाने तिच्याकडे पाहिले आणि ती इतकी का धास्तावली होती हेच तिला कळत नव्हते.
"तो आज शोधला जाईल आणि बंधक होईल" स्त्री म्हणाली व तिने एक हुंदका दिला. त्या स्वरातून तीच राग आणि उद्वेग लक्षात येत होता. "मला माहीत आहे त्याला या वाईट परिस्स्थीतीत कोणी लोटले आहे ते! नीच, भयानक जीव! किळसवाणी, भाडोत्री क्षुद्र स्त्री!" त्या स्त्रीचे ओठ थरथरत होते व नाक रागाने फणफणत होते. "मी असहाय्य आहे, तू ऐकते आहेस का, नीच बाई?"...मी लाचार आहे, तू माझ्यापेक्षा शक्तीशाली आहेस, पण माझी आणि माझ्या मुलांची बाजू घेणारा एक आहे! देव सगळे बघत असतो! तो आहेच! तो तुला मी गाळलेल्या प्रत्येक आश्रूची व मी जागून काढलेल्या सर्व रात्रींची शिक्षा देईल! ती वेळ येईल, त्यावेळी तुला माझी आठवण होईल.
पुन्हा शांतता पसरली. ती स्त्री खोलीत चालू लागली आणि तिने तिचे हात बांधले, पाशा मात्र अजूनही तिच्याकडे आश्चर्याने रिक्तपणे बघत होती. तिला काही कळत नव्हते व काही भयानक होणार आहे याची तिला अपेक्षी देखील नव्हती.
"बाई मला यातले काहीच माहीत नाही" ती म्हणाली, आणि तिला अचानक रडू कोसळले.
"तू खोटी बोलते आहेस!" ती स्त्री ओरडली, आणि तिचे डोळे तीच्याकडे अत्यंत रागाने रोखले. "मला त्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मी तुला बऱ्याच काळापासून ओळखते. मला माहीत आहे की मागच्या महीन्या पासून तो तुझ्यासोबत प्रत्येक दिवस घालवततो आहे."
"हो. मग काय? त्याचे काय? मला खुपा भेटणारे असतात, पण मी कोणालाच येण्यासाठी आग्रह करत नाही. तो त्याला वाटेल तसे करण्यास मुक्त आहे."
"मी तुला सांगते तिजोरीत पैसा नाही आहे हे त्यांना कळले आहे! त्याने कार्यालयात पैशांचा अपहार केला आहे! तुझ्या ....सारख्या क्षुद्र जीवासाठी, तुझ्या साठी त्याने खरे म्हणजे एक गुन्हा केलाय. ऐक,"
ती स्त्री थांबून पाशाकडे बघत ठसक्यात बोलली. "तुझी तत्वे नसतील; तू फक्त त्रास देण्यासाठी जगते.... हेच तुझे ध्येय आहे. पण कुणाचा यावर विश्वास बसणार नाही की तू इतक्या खालच्या पातळीवर उतरली आहेस की तुझ्यात मानवी भावनांचा काही अंशच उरला नाही! त्याची एक पत्नी आहे, मुलं...जर तो दोषी ठरला आणि हद्दपार झाला तर आमची उपासमार होईल, मुलं आणि मी....हे लक्षात घे. आणि अजुनही त्याला व आम्हाला गरीबी व अपमानीत होण्यापासून वाचवण्यासाठी संधी आहे. मी त्यांचेकडे आज नऊशे रुबल्स घेऊन गेले तर ते त्याला सोडून देतील. फक्त नऊशे रूबल्स!"
"काय नऊशे रुबल्स?"पाशाने शांतपणे विचारले. "मला...मला माहीत नाही...मी ते घेतले नाहीत"
"मी तुला नऊशे रुबल्स मागत नाहीये...तुझ्या कडे पैसे नाहीत, आणि मला तुझे पैसे नकोत सुद्धा. मी तुला दुसरे काहीतरी मागते आहे... पुरुष बहुदा तुझ्या सारख्या स्त्रीयांना महागड्या वस्तू भेट करतात. फक्त माझ्या नवऱ्याने तुला दिलेल्या वस्तू मला परत दे!"
"बाई, त्याने मला कधीच कसलीही भेटवस्तू दिली नाही! " पाशा कळवळून सांगू लागली.
"पैसे कुठे आहेत? त्याने त्याच्या स्वतः च्या, माझ्या व इतर लोकांच्या पैशांचा अपहार केला आहे...त्या सगळ्याचे काय झाले? ऐक, मी तुला भिक मागते! "मी रागाच्या भरात होते आणि मी तुला अनेक वाईट गोष्टी बोलल्या आहेत, पण मी माफी मागते. तू माझा द्वेष करतेच, मला माहीत आहे, पण तुला सहानुभूती असेल तर तुला माझ्या जागी ठेऊन पहा! मी तुला त्या वस्तू परत करण्याची विनंती करते!"
"हं!" पाशा म्हणाली, आणि तिने तिचे खांदे वर केले. "मी आनंदाने करेन, पण देव साक्षी आहे, त्याने मला कसलीही भेट दिली नाही. विश्वास ठेव, मी मनापासून सांगतेय. पण, तरिही तू बरोबर आहेस," ती गायिका गोंधळून म्हणाली,"त्याने मला दोन छोट्या वस्तू दिल्या होत्या. त्या मी निश्चीतच परत करेन, म्हणजे तुला त्या हव्या असतील तर."
पाशाने कपाटातला एक खण उघडला आणि एक सोन्याचे कडे आणि माणिक बसविलेली एक नाजूक अंगठी त्यातून काढली.
"हे घ्या, बाई!" त्या अपरिचीतेला त्या वस्तू स्वाधीन करत ती म्हणाली.
त्या स्त्रीने चेहरा पुसला आणि तीच चेहरा थरारला. तिला अपराध्याप्रमाणे वाटले.
"मला तू काय देते आहेस" ती म्हणाली. "मला कुणाचे उपकार नको आहेत, पण जे तुझ्या मालकीचे नाही...ते माझ्या नवऱ्याकडून उकळण्यासाठी तू तुझ्या विषयी त्याच्या मनात असणाऱ्या जागेचा तू फायदा उठवला...तो कमजोर दुःखी मनुष्य.... गुरुवारी मी तुला माझ्या नवऱ्यासोबत बंदरावर पाहिले तू महागडा छल्ला व कडे घातले होतेस. मला गरिब बीचारी शेळी समजण्यात अर्थ नाही. मी तुला शेवटचे विचारतेय: तू मला वस्तू देणार आहेस की नाही?"
"तू माझ्या शब्दावर विश्वास ठेव," दुःखी होत पाशा म्हणाली. "मी तुला निश्चितपणे सांगते की ते कडे व या छोट्याश्या अंगठी शिवाय मी तुझ्या नीकोल पेट्रोवीच कडून काहीही घेतले नाही. तो माझ्यासाठी गोड केक शिवाय काहीच आणत नाही."
"गोड केक!" अपरिचीता हसली "घरी मुलांना खायला काहीच नाही, आणि येथे तुझ्याकडे गोड केक आहेत. तू नक्की त्या भेटवस्तू परत करणार नाहीस"
काहीही उत्तर न मिळाल्याने, ती स्त्री हळूहळू खाली बसली, आणि विचार करता करता शुन्यात बघू लागली.
"आता काय करु?" ती विचार करू लागली. "जर मला नऊशे रुबल्स मिळाले नाहीत तर, तो देशोधडीला लागणार, आणि मुले व मी सुद्धा रसातळास जाणार. मी या नीच स्त्रीला मारुन टाकू की तीच्या पायावर नतमस्तक होऊ?"
त्या स्त्रीने तीच हातरुमाल तोंडावर दाबून धरला आणि हुंदके देऊ लागली.
"मी तुला भिक्षा मागते!" हुंदके देऊन रडत रडत ती पाशाला म्हणाली. "बघ तू माझ्या नवऱ्याला लूटले आणि देशोधडीला लावले आहेस. त्याला वाचव.... तुला त्याचे बद्दल काहीच वाटत नाही, पण मुलं...मुलं... मुलांनी काय केले आहे?"
रस्त्याच्या कडेने उभी राहून भुकेने रडणाऱ्या लहान मुलांची पाशाने कल्पना केली आणि तिला सुद्धा रडू कोसळले.
"बाई, मी काय करू शकते?" ती म्हणाली. "तू म्हणते की मी एक क्षुद्र स्त्री आहे आणि मी निकोल्ये पेट्रोविचला संपवीले. मी देवासाक्षीने खात्रीपूर्वक सांगते, मला त्याचे कडून कधीही काहीच मिळाले नाही...आमच्या समुहात श्रीमंत प्रशंसक असणारी फक्त एक समुह गायिका आहे, आमच्यापैकी इतर सर्व भाजी भाकरी खाऊनच कसेबसे आपली उपजिवी चालवतात. निकोल्ये पेट्रोवीच एक उच्च विद्या विभूषीत, सुव्यवस्थीत माणूस आहे, त्यामुळे मी त्याचे स्वागत केले. लोकांचे स्वागत करणे आमच्यावर बंधनकारक आहे.
मी तुला वस्तू मागते आहे! मला त्या वस्तू दे! मी शोक करत आहे...मी माझाच अपमान करत आहे...जर तुला हवे असेल तर मी तुझ्या पाया पडते. अर्थात तुला तसे हवे असेल तर!"
पाशा दु:खाने कळवळली आणि तिने हात उंचावले. तिला वाटले की या पांढ़या पडलेल्या सुंदर स्त्रीने स्वतःला खूप शाही पद्दतीने व्यक्त केले, जणू कही ती एखाद्या नाटकाच्या पटावरच वावरत असल्यासारखे. ती खरेच तिच्या पाया पडेल पण त्याने पाशाचा सन्मान, मोठेपणा वाढणार नाही उलट एका समुहगायीकेचा अपमानच होईल.
"खुपा छान, मी तुला वस्तू देते!" डोळे पुसत कोंडी फोडल्यागत पाशा म्हणाली. "सर्व परीने तुला मी मदत करते. फक्त त्या वस्तू निकोल्ये पेट्रोवीच कडून नाहीत...मला त्या इतर प्रसंशकाकडून मिळाल्या आहेत. जसे तू कृपया..."
पाशा ने कपाटाचा खण उघडला व त्यातून एक हिऱ्यांचा ब्रुच, एक माळ, काही अंगठ्या आणि कडे काढून ते सर्व त्या स्त्रीस दिले.
"तुला आवडले असतील तर ते घे, फक्त मला तुझ्या नवऱ्या कडून कधीही काहीच मिळाले नाही. त्या वस्तू घे आणि श्रीमंत हो," पाया पडण्याच्या धमकीने भेदरलेली पाशा पुढे म्हणाली,"आणि जर तू एक स्त्री असशील...त्याची एकनिष्ठ पत्नी असशील तर तू त्याला तुझ्या कडेच ठेवले पाहीजेस. मला असेच वाटते. मी त्याला येण्यासाठी बोलावले नव्हते. तो स्वतःहुन आला होता."
डोळ्यातील पाण्यातून त्या स्त्रीने तिला दिलेले दागदागीने न्याहाळले आणि म्हणाली: "हे म्हणजे सर्वकाही नव्हे...हे पाचशे रुबल एव्हढे सुद्धा नसेल."
पाशाने त्वेशाने छातीवरची एक सोन्याचे घड्याळ, एक सिगार पेटी आणि कानातल्या कुड्या ओढून काढल्या आणि ते तीच्या हाती ठेवत म्हणाली, "माझ्या कडे याशिवाय काहीच राहीलेले नाही....तू शोधू शकतेस"
त्या आगंतूक महीलेने एक उसासा टाकला, थरथरत्या हाताने त्या वस्तू आपल्या रुमालात बांधल्या आणि एक शब्दही न उच्चारता निघून गेली. तिने डोकेसुद्धा हलवीले नाही.
लागूनच असणाऱ्या खोलीचे दार उघडून कॉलपाकोव्ह आत आला. तो एकदम फिका पडला होता आणि अस्वस्थपणाणे काही काहीतरी खूप कडू खाल्ल्याप्रमाणे आपले डोके सारखे हलवत होता. त्याचे डोळे आश्रुंनी ओथंबले होते.
"तू मला काही भेट दिली होतीस?" पाशाने त्याचेवर धावून जात विचारले. "तू मला विचारण्याची संधी दिलीस कधी?"
"भेटवस्तू... त्याचे काही नाही!" कॉल्पाकोव्ह म्हणाला, आणि त्याने त्याचे डोके वळवले. "अरे देवा! ती तुझ्या समक्ष रडली, तिने तीच अवमाने केला "
"मी तुला विचारते आहे, तू मला काय भेट म्हणून दिलेस?" पाशा ओरडली.
"अरे देवा! ती, एक स्त्री, खूप माननिय, खूप पवित्र...ती तुझ्या पाया पडण्यास तयार होती....या बाईच्या! आणि ती माझ्यामुळे इथे आली! मी तिला येथे येण्यास परावृत्त केले."
त्याने तिचे डोके त्याचे हातात पकडले आणि जोरजोराने कण्हू लागला.
"नाही, मी स्वतः ला यासाठी कधीच क्षमा करू शकणार नाही! मी स्वतःला कधीच माफ करणार नाही! माझ्या पासून दुर जा... नीच, हलकट!" थरथरत्या हाताने तिला दुर ढकलुन जात तो रागाने ओरडला. "तिने तुझे पाय धरले असते, आणि...आणि ते ही तुझे ! अरे देवा!"
त्याने घाईघाईने कपडे घातले, आणि तिरस्काराने पाशाला बाजूला ढकलून दाराकडे वळला व बाहेर पडला.
पाशा खाली पडून मोठ्याने आक्रोश करु लागली. भावनेच्या आहारी जाऊन देऊन टाकलेल्या तीच्या वस्तूंमुळे ती ला आधीच खूप पश्चाताप होत होता आणि आता तीच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तिला आठवले तीन वर्षापूर्वी एका व्यापाऱ्याने तिला कसे विनाकारणच बदडले होते, आणि तिने कधी नव्हे एव्हढा आक्रोश केला होता.
समाप्त